काळापाषाणातून तीन फुटाची व १५० वर्षे जुनी देवीची मूर्ती; सकाळी ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले राहणार
गिरीष पळसोदकर / खामगाव
घाटपुरी येथील श्री जगदंबा संस्थान मध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्र उत्सवाला सोमवार, २२ सप्टेंबर २०५२५ पासून प्रारंभ झाला आहे. सकाळी साडेनऊ वाजता मंदिराचे विश्वस्त विलास दळी यांच्या हस्ते जगदंबा वेद विद्यालयाच्या ब्रह्मावृद्धांच्या मंत्रोच्चारात व भाविकांच्या उपस्थितीत घटस्थापना करण्यात आली. सकाळी ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे. मंगळवार, २३ सप्टेंबर रोजी भाविकांची मोठी गर्दी पहाटेपासून दिसून आली.यामध्ये महिलांची संख्या अधिक होती. यंदा अष्टमीचा होम ३० सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता होणार आहे. अष्टमीच्या होमानंतर आरती करण्यात येणार आहे त्यानंतर उपस्थित भक्तांना बुंदी प्रसादाच्या पाकिटाचे वितरण करण्यात येणार आहे
तीन फुटाची काळ्यापाषणातील देवीची मूर्ती
मंदिरातील देवी ही घाटपुरीवासीयांचे कुलदैवत मानले जाते. काळा पाषाणातून तीन फुटाची व १५० वर्षे जुनी देवीची मूर्ती असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ही देवी जागृत असल्याची ख्याती सर्व दूर आहे नवरात्राच्या काळात देवीच्या दर्शनासाठी गुजरात, मुंबई, पुणे, इंदोर, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, अकोला, बुलढाणा जिल्हा सह इतर जिल्ह्यातून देवीचे भक्त दर्शनासाठी येत असतात व नवस फेडण्यासाठी विशेष करून नवरात्रोत्सवाच्या काळात येतात देवीच्या अंगावर सोन्या चांदीचे आभूषणे चढविण्यात आले आहे.
चोख बंदोबस्तासह पंचवीस सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वीत
नवरात्राच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाची पोलीस चौकी मंदिर परिसरात उभारण्यात आली असून मंदिराच्या परिसरात यंदा सुरक्षतेच्या दृष्टीने पंचवीस सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. मंदिरात २४ तास सेक्युरिटी गार्ड तैनात करण्यात आले आहे. देवीच्या मंदिर परिसरात प्रसाद खेळणी कटलरी ओटीचे साहित्य हार फुले रेवडी फुटाणे मुरमुरे या दुकानात बरोबरच खवय्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थाची दुकाने थाटण्यात आली आहे. विही गावचे जवळपास २५ सेवाधारी हे मंदिरात सेवा देत आहे. देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांना प्रसाद देण्यात येत आहे. मंदिराचा परिसर फुलांनी सजविण्यात आला आहे शेकडो भाविकांच्या उपस्थितीत सकाळ व संध्याकाळी आरती करण्यात येत आहे.
अखंड ज्योतीचे ९०० दिवे
मनोकामना पूर्ण होण्यासाठी अनेक भाविक भक्त या मंदिरात नवरात्राच्या नऊ दिवस अखंड ज्योतीचे दिवे लावतात. यंदा भक्तांच्या मागणीनुसार ९०० दिवे लावण्यात आले आहे. या दिव्याच्या प्रकाशाने मंदिराचा परिसर उजळून निघत आहे. हे दिवे भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून नवरात्र काळात या मंदिरात अखंड दीप लावण्यात येत आहे. या दिव्यांवर लक्ष ठेवण्यासाठी व तेल टाकण्यासाठी आठ-आठ तासाच्या आळीपाळीने प्रत्येकी दोन कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे त्याचबरोबर मंदिराचा परिसर फुलांनी सजविण्यात आला आहे.