जिल्ह्यातील सर्व देशी व विदेशी मद्य विक्री  दुकाने बंद ठेवण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

District Collector orders closure of all domestic and foreign liquor shops in the district

ईद-ए-मिलाद व गणेश विसर्जनाच्या दिवशी मद्य विक्रीवर बंदी

बुलढाणा न्यूज

बुलढाणा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यात आगामी ईद-ए-मिलाद, अनंत चतुर्दशी व गणेश विसर्जन या दिवशी कोरडा दिवस अर्थात मद्य विक्री बंदीचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी जारी केला आहे. महाराष्ट्र दारुबंदी कायद्याअंतर्गत जारी आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व देशी व विदेशी मद्य विक्री अनुज्ञप्तीधारकांची दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

यानुषंगाने जिल्ह्यातील एफएल-२, एफएल-३, एफएल-४, एफएल/बीआर-२ व सीएल-३ अनुज्ञप्तीधारकांना आपली दुकाने व मद्य विक्री केंद्रे संबंधित दिवशी बंद ठेवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तसेच आदेशाचे उल्लंघन करणार्‍या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हाधिकार्‍यांनी दिला आहे.

या दिवशी राहणार कोरडा दिवस

५ सप्टेंबर २०२५ (शुक्रवार): ईद-ए-मिलाद निमित्त संपूर्ण दिवस दारूबंदी.

६ सप्टेंबर २०२५ (शनिवार): अनंत चर्तुदशीच्या दिवशी कायद्यानुसार दारूबंदी लागू.

७ व ८ सप्टेंबर २०२५: ज्या दिवशी व ठिकाणी गणेश विसर्जन होईल, त्या ठिकाणी विसर्जन सोहळा पूर्ण होईपर्यंत दारूबंदी राहणार आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांना या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रत्येक उत्सव काळात अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्रीवर देखील बारीक लक्ष ठेवावे, असे आदेशात नमूद केले आहे.

याव्यतिरिक्त, संबंधित कार्यक्षेत्रात काही अनुचित घटना घडल्यास त्याबाबत संबंधित दुय्यम निरीक्षकांना थेट जबाबदार धरले जाईल, असा इशारा देखील अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें