बुलढाणा : जिल्ह्यात खरीप हंगाम 2024-25 अंतर्गत तेरा तालुक्यांमध्ये तब्बल पाच लाख तीन हजार क्विंटल इतक्या विक्रमी प्रमाणात ज्वारीची खरेदी झाली आहे. शासन निर्णयानुसार खरेदी झालेली ज्वारी संबंधित जिल्ह्यातील रेशनकार्डधारकांना वाटप करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार सप्टेंबर 2025 पासून जिल्ह्यातील प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांना प्रति व्यक्ती दोन किलो ज्वारी व तीन किलो तांदूळ तर अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा 25 किलो तांदूळ आणि 10 किलो ज्वारीचे वाटप निश्चित करण्यात आले आहे.
तथापि, बुलढाणा जिल्ह्यास दरमहा 39 हजार क्विंटल गहू व 64 हजार क्विंटल तांदळाची गरज असताना गव्हाऐवजी ज्वारीचे वाटप केल्यामुळे रेशनकार्डधारकांना गहू मिळणे बंद झाले आहे. गहू हा जिल्ह्यातील जनतेच्या आहाराचा मुख्य घटक असून पोळी ही दैनंदिन ताटातील अत्यावश्यक बाब आहे. गहू उपलब्ध न झाल्यास सर्वसामान्य कुटुंबांना ज्वारीच्या भाकरीवर भागवावे लागणार असून यामुळे आहारातील समतोल बिघडून गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
सध्या गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद, नवरात्री, दसरा आणि दिवाळी यांसारख्या महत्त्वाच्या सणासुदीचा काळ सुरू झाला आहे. गहू हा प्रत्येकाच्या अन्नसंस्कृतीशी निगडित असून ऐन सणासुदीच्या दिवसांत गव्हाच्या ऐवजी ज्वारीचे वाटप सुरू केल्याने जनतेच्या भावनांना धक्का पोहोचत आहे. अशा काळात गव्हाऐवजी ज्वारीचे वाटप करणे योग्य नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. म्हणूनच जिल्ह्यात गव्हाचे नियमित वाटप सुरू ठेवावे आणि ज्वारीचे वाटप करावयाचे असल्यास ते गहू व तांदळाच्या अतिरिक्त प्रमाणात करावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवक्ता ॲड.जयश्री शेळके यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.