सर्पमित्र श्रीराम रसाळ व पत्रकार प्रशांत खंडारे यांच्या हस्ते सेवानिवृत्त जवानाचा सत्कार

बुलढाणा न्यूज –
१७ वर्षाची देशसेवा करणारे जवान जोहरे स्वगृही परत आल्याने बुलढाणा : देशरक्षणार्थ विविध ठिकाणी कर्तव्य बजावल्यानंतर सैन्य दलातील सेवानिवृत्त झालेल्या शेलगाव आटोळ ता.चिखली येथील इंडीयन आर्मीचे हवालदार संदीप जोहरे हे १७ वर्ष निर्विवाद सेवा देऊन स्वगृही जात असतांना बुलढाणा शहरातील चिखली मार्गावरील सोसायटी पेट्रोल पंपाजवळ जोहरे यांचा सपत्नीक सत्कार पत्रकार प्रशांत खंडारे यांच्या हस्ते करण्यात आला.
सैन्य दलात भरती होऊन देशसेवा करण्याची अनेकांची स्वप्ने असतात. पण हे स्वप्न प्रत्येकाचंच पूर्ण होत नाही. सैनिक सीमेवर जीवाची बाजी लावून देशाचं संरक्षण करतात. पण हा सैनिक जेव्हा देशसेवा करुन पुन्हा एकदा घरी परततो तेव्हा प्रत्येकाचं ऊर अभिमानाने भरुन येतं.असाच क्षण आज शुक्रवार, १ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८ वाजता अनेकांनी अनुभवला.

बुलढाणा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. १७ वर्ष देशसेवा करून इंडियन आर्मीचे (फर्स्ट महार रेजिमेंट) येथून सेवानिवृत्त होऊन सुखरूप चिखली येथील स्वगृही जात असताना बुलढाण्यातील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत खंडारे यांनी त्यांचा कृतज्ञता पूर्वक सत्कार केला. पुष्पहार, शाल, श्रीफळ आणि पेढा भरवून जवान जोहरे यांचे स्वागत केले असता ते भारावून गेले होते.

या छोटेखानी सत्कार सोहळ्याचे आयोजन सर्पमित्र श्रीराम रसाळ यांनी केले होते. सत्कार करीत असताना १७ वर्ष देशसेवा करून सुखरूप गावी आल्याने त्यांच्या कुटुंबीयांसह उपस्थित नागरिकांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता. निवृत्त झालेल्या सैनिकांचा सत्कार करणे हा एक महत्वाचा आणि आदरणीय कार्यक्रम असतो. हा सत्कार, त्यांचे त्याग आणि सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे, असे यावेळी सर्पमित्र एस.बी. रसाळ म्हणाले. हवालदार संदीप डिंगाबर जोहरे यांचा आज शेलगाव आटोळ येथे सेवापूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला आहे. रॅली काढून त्यांना स्वगृही पोहचविण्यासाठी जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें