लोकशाहीर कॉम्रेड अण्णा भाऊ साठे,यांचा १ ऑगस्ट हा जन्म दिन “लेखन प्रेरणा दिन”घोषित करा!

Declare August 1, the birthday of democratic comrade Anna Bhau Sathe, as “Writing Inspiration Day”!

लोकशाहीर कॉम्रेड अण्णा भाऊ साठे हिंदू धर्मातील विषमतेमुळे जातिव्यवस्थेचे चटके बसल्याने,अस्पृश्यतेच्या जाचामुळे बालपणीच वाटेगावची शाळा सोडावी लागली.नंतर आई- वडीलांसह मुंबईत येऊन बाल वयातच खडतर मोलमजुरीची कामं करावी लागली, हाल अपेष्टा सहन केल्या.गिरणीत बाल कामगार म्हणून काम करताना व माटुंग्याच्या लेबर कॅम्पमध्ये रहात असतानाच त्यांचा १९३४-३५ साली, तेथे राहणाऱ्या व दलित , शोषित कष्टकऱ्यांसाठी झगडणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाचे नेते, कार्यकर्ते कॉ.आर.बी.मोरे,कॉ ‌के.एम.साळवी,कॉ शंकर नारायण पगारे आदींची.ओळख झाली.त्यांच्या संपर्कात आल्या नंतरच, अण्णा भाऊ साठे कम्युनिस्ट कार्यकर्त्यां सोबत काम करतानाच, त्यांच्याकडून धुळाक्षरे गिरविण्यास सुरवात केली व ते कार्यकर्त्यांच्या बरोबरीने लिहायला, वाचायला शिकले.त्यांची सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयांवरील समज वाढू लागली.त्यांच्यातील उपजत असलेला कवी, लेखक, कलावंत आपल्या गाण्यातून,पोवाड्यातून व्यक्त होऊ लागला.

त्यांनी आयुष्यातील पहीलं गाणं , धारावीला लागुन असलेल्या लेबर कॅम्पच्या झोपडपट्टीतील मच्छरावर लिहिले.नंतर त्यांनीं धनिकां कडून होणाऱ्या कामगारांच्या शोषणाविरुद्ध, ” एकजुटीचा नेता झाला कामगार तय्यार …
किंवा धर्मांधांच्या छळवणूकीवर प्रहार करणारे
” जग बदल घालूनी घाव, सांगुनी गेले मला भीमराव….. सुप्रसिद्ध मुंबईची लावणी,माझी मैना,अशी अनेक गाजलेली गाणी लिहिली.आणि हळूहळू पुढे ते लोकनाट्य ,कथा, कादंबरी,लिहू लागले. वारणेचा वाघ, चित्रा,वैजयंता फकिरा कादंबरी नंतर एक सर्जनशील, समर्थ लेखक म्हणून कॉ. अण्णा भाऊ साठे यांची देशाला व जगाला ओळख झाली.त्यांच्या साहित्याला अनेक पुरस्कार मिळाले.त्यांच्या कथा, कादंबर्या जगातील अन्य भाषात अनुवादीत झाल्या.
रशियातील कम्युनिस्ट सरकारने कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांना लेखक म्हणून सन्मानाने मॉस्को ला बोलाविले व मोठा सन्मान , गौरव केला.समाजातील तळागाळातील जात- वर्गातून, दलित,शोषितां मधून आलेल्या शाहीर ,लेखक, कार्यकर्त्याचा सन्मान जगात प्रथमच कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांच्या रुपाने असा प्रथमच जागतिक स्तरावर झाला होता. साधं प्राथमिक शालेय शिक्षणही न घेतलेल्या लोकशाहीर, साहित्यिकाच्या साहित्याची प्रथमच जगाने नोंद घेतली.

समाजातील अशा अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून येऊन, कुठल्याही प्रकारच्या सुखसुविधा नसताना, विपन्नावस्थेला तोंड देत व कम्युनिस्ट पक्षाच्या,लाल बावट्याच्या नेतृत्वाखाली, कामगार, शेतकरी, आदिवासी कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी जे लढे, संघर्ष सुरू होते, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो वा गोवा मुक्ती संग्राम त्या संघर्षात देहाने व लेखणीने सहभागी झालेल्या या लेखक,कलावंताने आपले जीवंत अनुभव साहित्यातून,गाणी,
पोवाड्यातून मांडले, चित्रित केले आहेत.त्यांनी कथा, कविता, गाणी, कादंबरी,नाटक,सिने पटकथा,लोकनाट्य, समिक्षा व वृत्तपत्रीय लेखन आदी.सर्व वाङमय प्रकार हाताळले आहेत व चौफेर विषयांवर सिद्धहस्त लेखन केले आहे. इंडियन पिपल्स थिएटर असोसिएशन ( इप्टा) या सुप्रसिद्ध पुरोगामी नाट्यसंस्थेचे कॉ अण्णा भाऊ साठे अखिल भारतीय अध्यक्ष राहिले आहेत. असा सन्मान तळागाळातून आलेल्या कुठल्याही लेखक, नाटककाराला कधी मिळाला नव्हता.

ज्या अण्णा भाऊ साठे यांना कधी महाविद्यालय, विद्यापीठात जाण्याची कधी संधी तथाकथित प्रस्थापित ब्राह्मणी, भांडवली समाजव्यवस्थेने दिली नव्हती. सत्ताधाऱ्यांच्या पाठिंब्यावर व पैशावर भरणाऱ्या तथाकथित ब्राह्मणी, भांडवली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी कधी कॉ अण्णा भाऊ साठे यांना सन्मानाने संमेलनात बोलाविले नाही. त्या अण्णा भाऊंची गाणी, पोवाडे, लोकनाट्य, कथा, कादंबर्या आज शाळा, महाविद्यालयात, विद्यापीठात अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना शिकवली जात आहेत.त्यांच्या लेखनावर भारतातील व जगभरातील मान्यताप्राप्त विद्यापीठात संशोधक, संशोधन, डॉक्टरेट करीत आहेत. त्यांच्या गाण्यातून, साहित्यातून व कर्तृत्वातून समाजातील तळागाळातील, दलित, आदिवासी, भटक्या विमुक्तांना,वंचित, शोषित कष्टकऱ्यांना शिक्षणाची, प्रबोधनाची ,जागृतीची, लढण्याची, संघर्षाची प्रेरणा मिळते.अवघं ४९ वर्ष आयुष्य लाभलेल्या कॉम्रेड अण्णा भाऊंचे कर्तृत्व, व्यक्तिमत्त्व,अचाट, अचंबित करणारे आणि सर्वानांच प्रेरणा देणारे होते.

महात्मा जोतीराव फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या प्रेरणेने १९५८ साली मुंबईत,भरलेल्या भारतातील पहिल्या ” दलित साहित्य संमेलनाचे ” कॉ .अण्णा भाऊ साठे हे उदघाटक होते. त्या संमेलनातील, ” हे जग,ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून दलितांच्या तळहातावर तरलेली आहे” हे दलित, शोषित, कष्टकर्यांच्या श्रमाचे कौतुक करणारे ऐतिहासिक भाषण पुढच्या अनेक पिढ्यांना व दलित साहित्य, चळवळीला प्रेरणा देणारे ठरले आहे.त्या नंतरच कॉ अण्णा भाऊंना वरील सन्मान मिळाला.आणि नंतरच दलित साहित्याचा झंझावात भारतभर पसरण्यास प्रारंभ झाला.
दलित साहित्याचे भाष्यकार व पहिल्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बाबुराव बागुल यांनी कॉ.अण्णा भाऊ साठे यांचा गौरव “भारताचा मॅक्झिम गॉर्की” म्हणून केला होता.

तेव्हा,अशा या प्रेरणादायी लोकशाहीर कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांचा १ ऑगस्ट हा जयंती दिन केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात ” लेखन प्रेरणा दिन” म्हणून घोषित करण्यात यावा आणि त्याची सुरवात महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन करावी.तसेच,देश पातळीवरही हा दिवस ” लेखन प्रेरणा दिन ” म्हणून साजरा होण्यासाठी शासनाने व मुख्यमंत्र्यांनी पाठपुरावा करावा असे आवाहन करीत आहे.
काॅम्रेड अण्णा भाऊ साठे यांचा जन्म दिन हा जर राष्ट्रीय स्तरावर ” लेखन प्रेरणा दिन” म्हणून घोषित झाला तर, त्या दिवशी देशातील प्रत्येक शाळा, महाविद्यालयात, अण्णा भाऊंच्या जीवन, साहित्यावर कार्यक्रम घेणे शासनाला बंधनकारक होईल .
त्या निमित्ताने विद्यार्थी, शिक्षकांना अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य वाचावे लागेल, ते साहित्य भारतातील सर्व भाषात शासनाला अनुवाद करावे लागेल, त्यामुळे अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य देशभर वाचले जाईल. आणि या सर्व गोष्टी झाल्या तर देशभरातील सर्व अण्णा भाऊ साठे प्रेमी, चाहते यांचा आनंद द्विगुणित होईल!

आज महाराष्ट्र शासन ” कुसुमाग्रज दिन ” साजरा करते.माजी राष्ट्रपती डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्म दिन केंद्र सरकार ” वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करते. त्या निमित्ताने सगळीकडे त्यांच्या साहित्यावर कार्यक्रम घेणे बंधनकारक झाले आहे.
त्याच पद्धतीने काॅम्रेड अण्णा भाऊ साठे यांचा जन्म दिन ” लेखन प्रेरणा दिन” म्हणून जर राष्ट्रीय स्तरावर घोषित झाला तर, देशभर काॅम्रेड अण्णा भाऊंचा जयंती दिन सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे व सरकारी कार्यालयात मोठ्या प्रमाणात साजरा होईल, त्यानिमित्ताने कार्यक्रम घ्यावे लागतील.

माझी ” लेखन प्रेरणा दिनाची” संकल्पना अनेकांना आवडली आहे.अनेक मान्यवर साहित्यिक, कलावंत, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था, संघटनांनी शासनाकडे तीन वर्षांपुर्वीच लेखी पत्र पाठवून वरील दिन साजरी करण्याची जाहीर मागणी केली होती..परंतु शासनाचा अजूनही त्याला प्रतिसाद नाही.

यंदा तरी महाराष्ट्र शासनाने येत्या १ऑगस्ट,या अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती दिनी वरील ” लेखन प्रेरणा दिनाची” अधिकृत घोषणा करावी,अशी मागणी मी पुन्हा मान्यवर लेखक, अर्जुन डांगळे, डॉ बाबुराव गुरव, डॉ यशवंत मनोहर,उर्मिला पवार, हिरा बनसोडे,डॉ भारत पाटणकर,माजी संमेलनाध्यक्ष डॉ लक्ष्मीकांत देशमुख, उत्तम कांबळे, डॉ प्रज्ञा दया पवार,निरजा, डॉ माया पंडित, डॉ प्रतिभा अहिरे, नाटककार शफाअत खान, गणेश विसपुते, डॉ श्यामल गरुड, डॉ कुंदा प्र.नी.,प्रतिमा जोशी,छाया कोरेगावकर, आनंद विंगकर, डॉ महेबुब सय्यद,अजय कांडर, डॉ लता प्र.म.,किशोर जाधव,कॉ.लता भिसे, निलिमा बंडेलु,संपत देसाई,प्रभू राजगडकर ,कलिम अजीम,संजय भिसे, सुरेश राघव,डॉ श्रीधर पवार, डॉ मुख्तार खान,सायमन मार्टिन, डॉ आदिनाथ इंगोले, डॉ दिलीप चव्हाण,प्रकाश मोगले, अण्णा सावंत,अर्जुन जगधने, सारिका उबाळे,सुरेश केदारे,प्रा. शोभा बागुल, दिपक पवार, सुनील कदम,धम्मा रणदिवे,अमरनाथ सिंग, श्रीधर चैतन्य,संपत देसाई, महादेव खुडे,सचीन बगाडे,कॉ.राम बाहेती,अविनाश कदम, शंकर बळी, सत्यपाल रजपूत, सुरेश साबळे,भारत यादव, दत्ता चव्हाण,राजानंद सुरडकर, दिलीप तायडे साहित्यिक, कलावंत व लोक सांस्कृतिक मंच, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, जनवादी लेखक संघ,जागर लोक कला पथक, दलित पँथर सुवर्ण महोत्सव समन्वय समिती,जाती अंत संघर्ष समिती आदी.सामाजिक, सांस्कृतिक संस्था, संघटनांतर्फे आम्ही जाहीरपणे ” लेखन प्रेरणा दिन” शासनाने राज्यात घोषित करावा व तशी घोषणा केंद्र सरकारनेही करावी, यासाठी मुख्यमंत्र्यांनी अधिकृत ठराव संमत करून पाठपुरावा करावा, अशी मागणी आम्ही करीत आहोत!

सुबोध मोरे, सेक्रेटरी
” लोक सांस्कृतिक मंच” मुंबई
संपर्क: ९८१९९९६०२९.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें