45 new Aadhaar service centers to be established in Buldhana district; Appeal to apply by August 13
बुलडाणा (जिमाका): बुलढाणा जिल्ह्यातील 44 महसूल मंडळे आणि बुलढाणा शहर येथे एकूण 45 नवीन आधार सेवा केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे. या केंद्रांसाठी महाऑनलाईनचे “आपले सरकार सेवा केंद्र” चालकांकडून अर्ज मागविण्यात येत असून, 13 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
या प्रक्रियेसाठी जाहिरनामा, नमुना अर्ज, अटी व शर्ती, पात्र/अपात्र उमेदवारांची यादी आणि निवड प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाचे नोटीस बोर्डवर तसेच www.buldhana.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया 30 जुलै 2025 पासून सुरू होऊन 13 ऑगस्ट 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत सेतू विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे चालू राहील.
जिल्ह्यातील विविध महसूल मंडळांत आधार किट देण्यासाठी केंद्र स्थापन केली जाणार
बुलढाणा (3), चिखली (6),
देऊळगाव राजा (3), मेहकर (5),
लोणार (3), सिंदखेड राजा (3),
मलकापूर (3), मोताळा (4),
नांदुरा (2), खामगाव (7),
शेगाव (3), जळगाव जामोद (2)
संग्रामपूर (1) या तालुक्यांचा समावेश आहे.
अर्जासोबत केंद्र चालकांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, शैक्षणिक पात्रतेची किमान बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र, MS-CIT किंवा समकक्ष संगणक प्रमाणपत्र, केंद्र चालवण्याचा अनुभव असल्यास त्याचे प्रमाणपत्र, तसेच संबंधित महसूल मंडळातील गावाचा रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. तसेच NSEIT सुपरवायझर प्रमाणपत्र अनिवार्य असून उमेदवाराने आधीच आपले सरकार सेवा केंद्र चालू केलेले असणे गरजेचे आहे.
आधार ऑपरेटर नियुक्त करताना एक वर्षाचा करारनामा करणे बंधनकारक असून, ऑपरेटर बदलला जाणार नाही याची नोंद घेण्याची सक्त आवश्यकता आहे. आधार किट मंजूर झाल्यानंतर महाआयटीच्या निर्देशानुसार 50 हजार रुपयांची बँक गॅरंटी फिक्स डिपॉझिट स्वरूपात देणेही आवश्यक राहणार आहे. आपले सरकार सेवा केंद्र चालक फक्त एकच आधार सेवा केंद्रासाठी अर्ज करु शकतात. कुटुंबातील इतर सदस्यांकडून अर्ज केल्यास दोन्ही अर्ज फेटाळण्यात येतील. तसेच, यापूर्वी आधार नोंदणी केंद्र चालवत असलेल्या केंद्र चालक किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य अर्ज करण्यास अपात्र राहतील.
केंद्र मंजूर झाल्यावर ते निर्धारित महसूल मंडळातच कार्यान्वित करणे अनिवार्य असून, केंद्र स्थलांतरित केल्यास तीव्र कारवाई केली जाईल. आधार केंद्राची कोणालाही हस्तांतरण करता येणार नाही व अधिक शुल्क आकारल्यास किंवा नियमभंग झाल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. या प्रक्रियेदरम्यान निवड संपूर्णपणे पारदर्शक पद्धतीने होणार असून, एका केंद्रासाठी एकापेक्षा जास्त पात्र अर्ज आल्यास निवड ‘ईश्वर चिठ्ठी’द्वारे केली जाईल. निवड प्रक्रियेवरील अंतिम निर्णय जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय आधार नियंत्रण समितीकडे राखीव राहणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सर्व पात्र “आपले सरकार सेवा केंद्र” चालकांनी योग्य कागदपत्रांसह निश्चित वेळेत अर्ज सादर करून या संधीचा लाभ घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी एनआयसीच्या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन केले आहे.