बुलढाणा न्यूज टिम
मेहकर – विधानसभेत संगठित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम २०२५ संदर्भात बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी अमली पदार्थांच्या वाढत्या प्रसारावर आणि त्याच्या दुष्परिणामांवर जोरदार भाष्य केलं. त्यांनी स्पष्ट केलं की, अमली पदार्थांचा वापर आणि व्यापार आता केवळ मेट्रो शहरापुरता मर्यादित न राहता, तो हळूहळू ग्रामीण भागात, नगरपरिषदांच्या हद्दीत व मोठ्या खेड्यांपर्यंत पोहोचला आहे. तसेच, मेंदू आणि कार्यक्षमता यावर होणार्या परिणामामुळे समाजाचा मोठा वर्ग अडचणीत सापडल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.
वरली मटका, ऑनलाइन जुगार आणि बेकायदेशीर दारू विक्रीबाबत मागील अधिवेशनातही त्यांनी पोलिस महासंचालक आणि पोलीस अधिक्षक यांच्यावर जबाबदारी टाकली होती. मात्र परिस्थिती पूर्ववत झालेली नसून, आता अमली पदार्थांचाही विळखा मेहकर, डोणगाव, लोणारसारख्या भागांमध्ये पडत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या गंभीर प्रश्नाकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना कराव्यात, व याला जबाबदार म्हणून त्या भागातील ठाणेदार, विभागीय पोलिस अधिकारी व पोलीस अधिक्षक यांना जबाबदार धरावे आणि वरली मटका जुगार, ऑनलाईन मटका, चक्री, अवैध दारू विक्री, चरस , गांजा, अवैध अड्डे बंद करावे अशी मागणी आमदार महोदयांनी सभागृहात केली.