सिटूच्या नेतृत्वात योजना कामगारांचा बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोर्चा
बुलढाणा न्यूज टिम कामगारांनी १०० वर्षांपूर्वी आपल्या हितासाठी लढून मिळविलेले ४४ कामगार कायदे आज रोजी केंद्रातील मोदी सरकार दुरुस्तीच्या नावाखाली भांडवलदार धार्जिणे बदल करित आहे. ह्या चार श्रमसंहिता म्हणजे कामगारांना गुलाम बनविण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप सीटूचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड पंजाबराव गायकवाड यांनी दि.९ जुलै २०२५ रोजी कामगार संघटनानी पुकारलेल्या देशव्यापी संपाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाला संबोधित करताना सरकारवर केला. त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, आज पर्यंत सुरक्षित समजले जाणारे किमान वेतन, कर्मचार्यांचा दर्जा, पेन्शन, भविष्य निर्वाह निधी, आरोग्य विमा आणि ग्रॅज्युटीला या चार श्रमसंहितेमुळे धोका निर्माण झाला आहे. त्याचा फायदा देशातील मुठभर भांडवलदारांना करून दिला जात आहे. सरकारच्या या कामगार विरोधी धोरणामुळे देशातील वाढते खाजगीकरण व कंत्राटीकरणामुळे कामगार, कष्टकर्यांच्या मनात आज मोठ्या प्रमाणात असुरक्षिततेची भिती निर्माण झाली आहे.तर दुसरीकडे राज्य सरकार राज्यात विशेष जनसुरक्षा विधेयक आणून घटनेने जनतेला दिलेल्या लोकशाही अधिकारासाठी लढे करण्याच्या मूलभूत अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्यासाठी हा कायदा विधानसभेत बहुमताच्या जोरावर पारित करण्याची तयारी करीत आहे. सरकार पुरस्कृत या दडपशाहीच्या विरोधात कामगारांनी आपली एकजूट दाखवावी असे आवाहन कॉम्रेड पंजाबराव गायकवाड यांनी केले. जिजामाता प्रेक्षागारातून निघालेल्या अंगणवाडी कर्मचारी,आशा वर्कर संघटक, प्रवर्तन शालेय पोषण आहार कामगारांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात समोर गेला. यावेळी कामगारांनी चार श्रमसंहिता रद्द करा! जनसुरक्षा विधेयक मागे घ्या, योजना कर्मचार्यांना शासकीय कर्मचार्यांचा दर्जा देण्यात यावा, किमान वेतन लागू करा, पेन्शन आणि ग्रॅज्युएटीची अंमलबजावणी करा, समान कामाला समान वेतन द्या इत्यादी प्रचंड घोषणा देऊन जिल्हाधिकारी कार्यालयाचा परीसर दणाणून सोडला. शेवटी या संपाच्या निमित्ताने मागण्यांचे निवेदन बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील, तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमोल गिते, शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री.पाटील यांना देण्यात आले. या मोर्चात कॉम्रेड पंजाबराव गायकवाड, माया वाघ, सुवर्ण भगत, निशा घोडे, मंदा डोंगरदिवे, ज्ञानेश्वर वाघमारे, शोभा काळे, ललिता बोदडे, वर्षा देशमुख ,जयश्री तायडे, रश्मीताई दुबे, प्रतिभा वक्टे, सुनील थुट्टे मनोरमा महाले,वर्षा शेळके,संगीता वायाळ, कविता चव्हाण, विजया ठाकरे,ज्योती खर्चे, मालता खरात, उषा डुकरे, रेखा जाधव इत्यादी सह हजारो अंगणवाडी सेविका आशा व गटप्रवर्तक आणि शालेय पोषण आहार कामगार संपात सहभागी झाले होते.