Sandalwood smuggling: Pushpa gang in custody of Malkapur city police
२२ लाख ८८९०० रुपये किमतीचे चंदन जप्त
मलकापूर
मलकापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच चंदन तस्करीची कारवाई करण्यात ठाणेदार गणेश गिरी व मलकापूर शहर पोलिसांना यश आले आहे. ही ऐतिहासिक कारवाई म्हटली तरी वावगे ठरणार नाही. लाखो रुपयांचे चंदन या कारवाईत जप्त करण्यात आले. यातून तस्करीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्थानिक बुलढाणा रोड वरील वानखेडे पेट्रोल पंपा जवळ नाकाबंदी दरम्यान सोमवार, दिनांक ७ जून रोजी सायंकाळी ही कारवाई केली. या प्रकरणात पोलिसांनी वाहनचालकाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाकाबंदी दरम्यान आयशर गाडी क्रमांक एमएच १६ एई ९६१६ गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने गाडी न थांबवता बोदवड रस्त्याने पळ काढला. पाठलाग करून गाडीला थांबवले. सुरुवातीला चालकाने उडवा उडविचे उत्तरे दिली. दरम्यान गाडीची झडती घेतली असता आयशर गाडीच्या ट्रॉली मध्ये आत कप्पा दिसून आला. त्या कप्प्यात पांढर्या रंगाच्या थैल्यांमध्ये पांढरे चंदन असल्याचा संशय आला. करिता पोलिसांनी आयशर गाडीला ताब्यात घेतले व मलकापूर शहर पोलीस स्टेशन येथे आणले. त्यानंतर वन विभागाशी संपर्क साधून त्यांच्या कर्मचार्यांकडून पांढरे चंदन असल्याची पुष्टी केली व पंचनामा केला. दरम्यान चालकाने सदर चंदन बीड येथून बुलढाणा, मलकापूर, बर्हाणपूर मार्गे मध्यप्रदेशात घेऊन जात असल्याचे पोलिसांना सांगितले.
या कारवाईत ८ क्विंटल २६ किलोचा मोठ्या प्रमाणात पांढर्या चंदनाचा साठा जप्त केला आहे. जप्त केलेले हे चंदन २२ लाख ८८ हजार ९०० रुपयाचे असून एकूण मुद्देमाल ३८ लाख ८८ हजार ९०० रुपयांचा जप्त करण्यात आला. प्राथमिक अंदाजानुसार जप्त केलेल्या चंदनाची किंमत यापेक्षाही अधिक असू शकते. चंदन तस्करी करून आंतरराज्यीय बाजारात चंदनाची विक्री करण्याचा डाव होता, अशी माहिती तपासात पुढे आली आहे. तस्करीमध्ये मोठे माफिया गट सामील असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी मलकापूर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.