बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष डॉ.सुकेश झंवर यांचा मेहकर येथे सत्कार
बुलढाणा न्यूज टिम
मेहकर – बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष श्री.राधेश्याम चांडक उपाख्य भाईजींनी लावलेले बुलडाणा अर्बनचे रोप डॉ.सुकेश झंवर यांनी वटवृक्षात रुपांतरीत केले. देशातंर्गत आणि परदेशी दौर्यांमध्ये सुद्धा बुलडाणा अर्बनची ओळख जिल्ह्याच्या बाहेर निर्माण झाली, ही गोष्ट अत्यंत अभिमानाची आहे. श्री.राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांच्या स्वप्नाला डॉ. सुकेश झंवर यांनी पूर्णाकार दिला, असे गौरवोद्वार केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी काढले.
बुलडाणा अर्बनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. सुकेश झंवर यांचा मेहकर विभागाच्या वतीने वेदिका लॉन्स, मेहकर येथे आयोजित समारंभात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करतांना केंद्रीय आयुष मंत्री ना. प्रतापराव जाधव बोलत होते. पुढे बोलतांना त्यांनी डॉ.सुकेश झंवर यांच्या नेतृत्वात संस्थेने १४,३५९ कोटी रुपयांच्या ठेवी गाठल्या आहेत. मेहकर विभागाच्या ठेवी १,००० कोटी रुपयांवर पोहचल्या आहेत. संस्थेची सुरुवात १५ ऑगस्ट १९८६ रोजी केवळ ७२ सभासद आणि १२ हजार रुपयांच्या ठेवींनी झाल्याचे ना.प्रतापराव जाधव म्हणाले.
याप्रसंगी व्यासपीठावर आ. सिद्धार्थ खरात, आ.मनोज कायंदे, माजी आमदार संजय रायमूलकर, संचालक किशोर महाजन, उद्योजक उदय सोनी, संतोष मापारी,ॠषी जाधव, प्रा. आशिष रहाटे, किशोर गारोळे व सिद्धेश्वर पवार, शाहीर ईश्वर मगर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात शुकदास महाराज गायक कला संच, हिवरा आश्रम यांनी भावस्पर्शी गायन सादर करुन केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजीम नवाज राही यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागीय व्यवस्थापक किरण सिरसाट, बीड व सिल्लोड विभागाचे व्यवस्थापक, लेखा परीक्षक, शाखा व्यवस्थापक व गोदाम व्यवस्थापक यांनी परिश्रम घेतले. बुलडाणा अर्बन ही केवळ पतसंस्था न राहता ग्रामीण भागाच्या आर्थिक समृद्धीचा आधारस्तंभ ठरत आहे. या वाटचालीत डॉ. सुकेश झंवर यांचे नेतृत्व निश्चितच नवे शिखर गाठेल, अशी भावना अनेक मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली.