बुलढाणा न्यूज टिम
विदर्भ साहित्य संघ बुलढाणा, प्रगती सार्वजनिक वाचनालय व सहर- ए गझल अकादमी बुलढाणा यांच्या वतीने बुलढाण्यात आषाढरंग कवी संमेलनाचे आयोजन स्थानिक डॉ.गायकवाड हॉस्पिटलच्या सभागृहात करण्यात आले होते.
याप्रसंगी प्रास्ताविकातून विदर्भ साहित्य संघाच्या या कार्यक्रमा मागील भूमिका मांडताना सुभाष किन्होळकर पुढे म्हणाले की, पाऊस हा नवनिर्मितीचे संकेत व सुजनाला चालना देत असतो अशावेळी नवीन लिहित्या हातांना प्रेरणा व त्यांच्या कवितेला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचे आयोजन विदर्भ साहित्य संघाच्या वतीने केले जाते. यातूनच भविष्यातील दर्जेदार साहित्य निर्मिती होत असते.
याप्रसंगी शहरातील कवी कवयित्रींनी आपल्या पाऊस, वारी, निसर्ग अशा विविध विषयांवरील कविता सादर केल्या.प्रा.डॉ.संगीता पवार यांनी गुंता ही कविता सादर करून पती-पत्नीच्या नात्यातील तरल संवेदना व्यक्त केल्या. कवी संदीप साठे यांनी पहिलाच पाऊस ही कविता सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. डॉ. वैशाली निकम यांनी कप बशी या वेगळ्या विषयावरची कविता सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. याप्रसंगी दत्तप्रभू ताकतोडे, प्रा.सुचेता खासबागे, संदीप राऊत, विजय बावस्कर, प्रशांत सुसर, कुशिवर्ता पालकर यांनी देखील कविता सादर केल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या श्री.अमरचंद कोठारी यांनी आपली पावसावरील कविता सादर करून पावसाचे विविध भाव आपल्या कवितेतून मांडले. प्रसिद्ध शायर तथा सर्जन डॉ गणेश गायकवाड यांनी देखील पावसावरील आपली गझल सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विदर्भ साहित्य संघ बुलढाणाच्या सचिव वैशाली तायडे यांनी केले.
याप्रसंगी शहरातील विविध क्षेत्रातील रसिक श्रोत्यांची लक्षणीय उपस्थिती होती. डॉ.विजयाताई काकडे, डॉ.गजेंद्र निकम, गजानन कांबळे, सर्जेराव चव्हाण, मुस्तकीम अरशद, आकीब जमीर , आसीफ मुनव्वर, मुनव्वर जमाखांन, डॉ दिपाली पाटील, रविकिरण टाकळकर, राजेंद्र काळे, प्रतिभाताई गायकवाड, प्रज्ञा लांजेवार, सत्य कुठे इत्यादींची उपस्थिती होती.