The Speak-Mackay movement, which teaches cultural traditions and culture
बुलढाणा
बुलढाण्याच्या तोमाई इंग्लिश स्कूलचे पाच विद्यार्थी दि.26 मे ते 1 जून 2025 कालावधीत आयआयटी हैदराबाद येथे झालेल्या स्पिक- मॅकेच्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात सहभागी झाले होते. या अधिवेशनात प्रथमित मुळे, अभिराज सावळे, आरुषी राठोड, अक्षरा राऊत ,रितिका मुळे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या विद्यार्थ्यांच्या एका परिसंवादाचे आयोजन व स्पिक- मॅके नेमकी काय कार्य करते याविषयी शाळेतील विद्यार्थ्यांना माहिती व्हावी म्हणून दि. 28 जुन 2025 ला आयोजन करण्यात आले होते.
स्पिक-मॅकेच्या अधिवेशनातील अनुभव कथन करतांना समन्वयक शिक्षिका अनुराधा चव्हाण यांनी आपले मत व्यक्त करतांना सांगितले की स्पिक- मॅके ही सांस्कृतिक परंपरा आणि संस्कृती जतन करणारी एक आपल्या देशातील फार मोठी चळवळ आहे .सकाळी साडेतीन वाजेपासून तर रात्री अकरा वाजेपर्यंत एक शिस्तबद्ध आयोजन स्पिक- मॅकेच्या या अधिवेशनात आम्हाला अनुभवायला मिळाले.
या परिसंवादात बोलतांना विद्यार्थ्यांनी स्पिक- मॅकेच्या सात दिवसाच्या कार्यक्रमात ज्या गोष्टी अनुभवायला मिळाल्या त्यावर आपली मते व्यक्त करीत असताना सांगितले की, सकाळी साडेतीन वाजता उठून चार वाजता नाद योग या सत्रात सगळ्या सहभागी विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी मिळाली, नादयोग एक प्रार्थनेकडून शांतीकडे नेण्यासाठी व आपल्या अंतर्मनातील मन:शांतीसाठी आवश्यक असलेले हे सत्र निश्चितच मनाला भावणारे होते. या सर्व बाबींचा आपल्या जीवनावर सुंदर प्रभाव पडतो व एक शिस्तबद्ध आयुष्य या माध्यमातून आपल्याला निर्माण करता येऊ शकते असा विश्वास देखील विद्यार्थ्यांनी या परिसंवादात व्यक्त केला. मोहिनीअट्टम या दाक्षिणात्य नृत्य प्रकारात आरुषी राठोड, रितिका मुळे आणि प्रथमित मुळे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन मोहिनीअट्टम या नृत्य प्रकारचा अभ्यास केला.
अभिराम सावळे व अक्षरा राऊत यांनी सरोद वादनाचे तंत्र कसे असते ते या ठिकाणी काही प्रमाणात अवगत केले. दररोज रात्री होणार्या विविध मान्यवर कलाकारांच्या संगीताच्या व वाद्य संगीताच्या कॉन्सर्ट ऐकण्याचा अनुभव खुप चांगला असल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले .या अधिवेशनात तोमोई इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे यासाठी सुजाता कुल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली तोमोई संचालिका डॉ. प्रतिमा व्यवहारे यांनी पुढाकार घेऊन आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा यासाठी पुढाकार घेतला होता.
निश्चितच स्पिक- मॅकेच्या या अधिवेशनातून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले व तेथून शिकून आलेल्या योग व संगीत या गोष्टींचा फायदा आमच्यासह आमच्या शाळेतील इतर सहकारी मित्रांना व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे सहभागी विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले.