बुलडाणाः येथील बसस्थानकामध्ये लोकनेेते गोपीनाथ मुंडे यांना जयंतीनिमित्त आज गुरुवार, दि.१२ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता अभिवादन करण्यात आले. जयंती कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे बुलडाणा तालुका उपाध्यक्ष तथा चिखला ग्रामपंचायतचे सरपंच अॅड.पराग राजेंद्र वाघ तसेच काँग्रेसचे माजी नगरसेवक अनिल वारे हे होते. सर्वप्रथम सरपंच अॅड.पराग राजेंद्र वाघ यांच्याहस्ते लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर संत श्री. भगवान बाबा यांच्या प्रतिमेला काँग्रेसचे माजी नगरसेवक अनिल वारे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.

याप्रसंगी गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यावर प्रकाश टाकतांना भाजपाचे बुलडाणा तालुका उपाध्यक्ष तथा चिखला ग्रामपंचायतचे सरपंच अॅड.पराग वाघ यांनी उपस्थितांना सांगितले की, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा जन्म १२ डिसेंबर १९४९ रोजी बीड जिल्ह्यातील नाथरा येथे झाला. बीड हा त्यांचा लोकसभा मतदारसंघ होता. त्यांनी आणि प्रमोद महाजन यांनी भाजपाला राज्यात मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. राज्यात या पक्षाची पायाभरणी त्यांनी केली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. तसेच गोपीनाथ मुंडे यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. इंदिरा गांधींच्या काळात देशात आणीबाणी लागली. त्याला गोपीनाथ मुंडे यांनी कडाडून विरोध केला होता. त्यांना यावेळी अटक करुन नाशिकच्या तुरूंगात टाकण्यात आले होते. तसेच २०१४ मध्ये बीड लोकसभा निवडणुकीत ते प्रचंड मतांनी विजयी झाले. लोकसभेत भाजपाच्या उपनेतेपदी त्यांची निवड झाली. यानंतर २६ मे २०१४ रोजी त्यांनी केंद्रीय ग्रामविकास मंत्री म्हणून शपथ घेतली. पण हा आनंद फार काळ टिकला नाही, असे अॅड.पराग वाघ यांनी सांगितले.
तर काँग्रेसचे माजी नगरसेवक अनिल वारे यांनी संत श्री भगवान बाबा यांच्या कार्याबाबत उपस्थितांना यावेळी माहिती दिली. या कार्यक्रमास सरपंच अॅड.पराग राजेंद्र वाघ,काँग्रेसचे माजी नगरसेवक अनिल वारे बद्री मुंडे, प्रशांत थोरात , शार्दुल कापसे, प्रज्वल गीते, मयूर नागरे वैभव मुंडे, नितीन वाघ, अनिल वारे, अजित पालवे, देवानंद ताठे, रामकिसन गीते,डॉ.प्रशांत बुधवत, आशिष वाघ, ज्ञानेश्वर घुगे, सुधाकर सुसर, नारायण गीते रामराव आघाव, बद्रीनाथ कायंदे, प्रवीण थोरात तथा बुलडाणा शहरातील वंजारी समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.