पोळ्याच्या दिनी ‘मारबतीची’ परंपरा व ऐतिहासिक मिरवणूक नागपूर नगरीचा ठेवा ! ही मिरवणूक तर नागपूरची आन, बान आणि शान आहे, हा उत्सव त्या मागचा उद्देश !
काळी व पिवळी मारबत असे दोन प्रकार आहेत. चार दिवस तिची विधिवत स्थापना केली जाते. लहान मोठे सांस्कृतिक कार्यक्रम या निमित्ताने होतात. महाप्रसादाचे आयोजन केले जाते आणि तान्ह्या पोळ्याच्या दिवशी यांची मिरवणूक काढली जाते. आणि दहन केले जाते. लहान मोठे सगळेजण मिरवणूक मार्गाच्या दुतर्फा उभे राहून मारबत व बडग्या बघतात. या दिवशी नागपूर व जवळपासच्या गाव-खेडयातील लोकं नागपूरला आपल्या लहानग्यांना घेउन येतात. आज या शेकडो वर्षांच्या परंपरेला टिकवून नागपूरची ओळख आणि वेगळेपण हे औचित्य साध्य झाल्यामुळे आजही टिकून आहे. ऐतिहासिक सोहळा नागपूर नगरीचा ठेवा अनेकांना कळावा यासाठी हा लेखन प्रपंच !
पूर्वी मारबत महोत्सव थोडा बिभत्सेकडे झुकलेला होता. त्यामुळे मारबत मिरवणुकीत जाणे हीन अभिरुचीचे मानले जायचे. पण आता परिस्थिती बदलली आहे. भारतातला हा एकमेव उत्सव नागपूर शहरात संपन्न होत असतो, त्या मागे उदात्त हेतू आहे. ‘हे लक्षात आल्याने आता मारबत मिरवणुकीतील असभ्यता बऱ्यापैकी कमी झालेली आहे. कित्येक भाविक स्वत:च्या समस्या दूर व्हाव्यात म्हणून मारबतीला नवस बोलतात. वर्षानुवर्षे प्रचंड उत्साहात हा सोहळा साजरा होतो, होत राहील. तेव्हा या मारबत सोहळयात सहभागी होऊ आणि म्हणूयात –
मना मनातली अस्वस्थता, हेवेदावे, भीती, रोगराई
घेऊन जाऽऽ गे मारबत
“सगळे अशुभ, अमंगळ घेऊन जाऽऽ गे मारबतऽऽऽ!” या आरोळ्यांनी दरवर्षी ‘तान्ह्या पोळ्या’ च्या दिवशी नागपूरातील महाल इतवारी भाग – दुमदुमुन गेलेला असतो. मारबत हा सोहळा संपूर्ण भारतात फक्त नागपुरातच भव्य दिव्य स्वरुपात साजरा होतो. मारबतही नागपूरकरांची अशी ग्रामदेवता आहे की ती या गावावर येणारी सगळी संकटे, आपल्या सोबत दूर घेऊन जाते आणि विसर्जित होते.
काळी मारबत 138 वर्षांपासून चालू आहे. या काळ्या मारबतीचा संबंध महाभारतकाळाशीही जोडल्या जातो. पुतना मावशीचे रूप धारण करून भगवान कृष्णाला मारण्याचा प्रयत्न केला आणि कृष्णाच्या हातून तिचा मृत्यू झाल्यावर गावकऱ्यांनी तिची धिंड अर्थात मारबत काढली आणि गावाबाहेर तिला जाळले. यामुळे गावावर पुन्हा कधीही समस्या, संकटे आली नाहीत, अशी आख्यायिका आहे. याच संदर्भाने नागपुरातही काळी-पिवळी मारबत काढण्यात येते. या मारबतींना शहराच्या बाहेर जाळल्याने शहरातील कुरीती आणि संकटे संपतात, अशी मान्यता आहे.
जन्माष्टमी नंतर सणवार एकमेकांच्या हाता हात गुंफुन येतात पिठोरी अमास्येनंतर भाद्रपदात गौरी-गणपतीचे आगमन होते. खरंतर विचाऱ्या अमावस्येला सर्वजणच आळतात त्यादिवशी मुहूर्त, नवीन खरेदी, गोडधोड काही नसतं. अपवाद फक्त दोनच. एक श्रावणी अमावस्या आणि दुसरी लक्षमीपूजनाची आश्विन अमावस्या बैलपोळयाची दर्शग पिठोरी अमावस्या म्हणजे श्रावण आणि भाद्रपदामधला संधिकाल. बैलपोळयापासुन अनंत चतुर्दशीपर्यंत काही सण एकमेकांना बिलगुन उभे आहेत. त्यांच्यातला एक समान दुवा म्हणजे गल्ली-बोळींमधुन अत्यंत उत्साहाने काढण्यात येणाऱ्या मिरवणुका, बैलपोळ्याला सजवलेल्या बैलांची वाजत-गाजत मिरवणूक निघते तर दुसऱ्या दिवशी तान्ह्या पोळ्याला कालीपिलीची मारबत निघते. अनंत चतुर्दशीला पुन्हा ढोलताशा वाजतो आणि एरवी सुस्तावलेली गल्लीबोळ त्यावर बेभान थिरकू लागते.
मूळात मारबत ही प्रथा मध्यप्रदेशातील काही आदिवासी जमातीत दिवाळीच्या रात्री पाळली जाते. विशिष्ट आकारातली मातीची मूर्ती इडा पीडा, अमंगलतेचे प्रतिक म्हणून गावाबाहेर ढकलत नेतात. पण मग ही प्रथा खूप वेगळ्या स्वरूपात नागपुरात कशी रुजली? यामागचा इतिहास असा की, महाराणी बाकाबाई भोसले या नागपूर भोसल्यांच्या राणीने इंग्रजांशी तथाकथित हातमिळवणी केली. त्यामुळे नागपूरचे समाजमानस क्षुब्ध झाले. या घडल्या घटनेचा मोठ्या प्रमाणावर निषेध करण्यासाठी बाकाबाईला स्वार्थी, देशद्रोही ठरवून त्यांचे प्रतिक म्हणून “काळ्या मारबती” चा जन्म झाला. तसेच त्यांचे पती रघुजीराजे भोसले (दुसरे) यांनी त्यांना रोखले नाही म्हणून त्यांचे प्रतिक बडग्याच्या रूपाने अवतरले. पुढे इंग्रजांना नामोहरम करण्यासाठी कर्तबगार बाकाबाई भोसल्यांची ती रणनीती होती हे सिद्ध झाले. पण सुरू झालेली प्रथा बंद पाडणे नागपूरकरांना शक्य झाले नाही. मग मारबत ही दुष्टता, अमंगळ रूढी यांचे वहन करून स्वतः सोबत घेऊन जाणारी देवता म्हणून जनमानसात रुजली आणि आता वर्षानुवर्षे ही प्रथा पाळली जाते. तर, विविध सामाजिक समस्या, अनिष्ट रूढी, परंपरा यांचं प्रतिक म्हणून विविध पिवळी मारबत निघते.
काळ्या मारबतीला पुतना मावशीचं रूप मानलं जातं. म्हणूनच तिच्या स्तनांमधून दुग्धधारा पाझरतात. अनंत चतुर्थीच्या अगोदर भागवत एकादशीला वामन जयंती असते. हे सर्व दिवस प्राचीन संस्कृतीच्या अद्भुत धाग्याने गुंफलेले आहेत. बाळकृष्ण आणि पुतना मावशीची गोष्ट विष्णुपुराण, भागवत पुराण, हरिवंश, ब्रह्मपुराण, अग्निपुराण, पद्मपुराण आणि ब्रम्हवैवर्त पुराणामध्ये थोडयाफार फरकाने दिली आहे. सर्वच पुराणांमध्ये आहे की, कंसाने पुतनेला बाळकृष्णाला मारण्यासाठी पाठविले. हरवंश आणि पद्मपुराणामध्ये ती रात्री येऊन लहान मुलांना मारते. काळया मारबतीने हाच रात्रीचा रंग ल्येवलेला आहे. भागवत आणि ब्रम्हवैवर्त पुराणानुसार पुतनेच्या मनीचा भाव कसाही असा. श्रीकृष्णाच्या स्पर्शाने तिला मोक्ष प्राप्त झाला. बाळकृष्णाने मारल्यावर गावकऱ्यांनी तिच्या अंगाचे लचके तोडून तिला जाळले. पण त्या धुरातून दिव्य सुगंध येऊ लागला ती मुक्तात्मा झाली, म्हणुन तिचे महत्व.
“वैदिक व नंतरच्या काळात बरेचदा वामनाचा उल्लेख आलेला आहे. बुटक्या आणि खुज्या माणसांच्या कथांमध्ये बुटका केवळ ठेंगणा नसतो तर त्यात असाधारण अशी दैवी शक्ती दिसते. ‘हिमगौरी आणि सात बुटके’ ही कथा प्रत्येकाने वाचली असेलच. बलीराजाला पाताळात गाडण्यासाठी विष्णूने वामनाचे रूप घेतले तसेच दुसऱ्याही एका कथेत धुंधु राक्षसाचा वामनाचे रूप घेऊन त्याने पराभव केला आहे. कश्यप आणि दनु यांचा मुलगा धुंधु स्वर्गप्राप्ती होण्यासाठी अश्वमेध यज्ञ करतो आणि देव घाबरून विष्णूकडे मदतीसाठी धावतात. त्यामुळे वामनाचे रूप घेऊन विष्णू धुंधुकडे आला आणि आल्यावर देविका नदीच्या पात्रात स्वतःला झोकून दिले. यज्ञ सोडून सर्वजण त्याला वाचविण्यासाठी गेले तेव्हा तो म्हणाला की, “निर्धन असा मी वर्षभरापासून गटांगळ्या खात आहे.” धुंधुने त्याला वर मागण्यास सांगितले, तेव्हा वामन म्हणाला, “मी बुटका, काय मागणार! मला माझ्या तीन पावलांएवढ्या लांबीची भूमी दे.” धुंधुने मान्य केल्यावर वामनाने दोन पावलातच सबंध विश्व व्यापून टाकले आणि तिसरे पाऊल ठेवले ते धुंधु राक्षसाच्या पाठीवरच !
श्रावणी अमावास्येला बैलपोळा सजतो. घरोघरी पुरणपोळीचा गोडसर खमंग वास येत असतो. खांदेमळणी करून सायंकाळी बैलांच्या खांद्याला हुरमुज मळला जातो. बैलाच्या शिंगाला रंग लावून बेगड चिटकवायचे. नवीन दावन, पेंडी, गळ्यात कडे, नव्या वेसणी, म्होरक्या घालून अंगावर रंगांचे ठिपके, शिंगाला शेंब्या गोंडे, पायात वाळे, झुली, बाशिंग, चाळ घालून सजवलेल्या सर्जाची गावात वाजत-गाजत मिरवणूक निघते. घरी आल्यावर ओवाळून नैवेद्य दाखवून पुरणपोळी खाऊ घालायची. दुसरे दिवशी नदी-ओढ्यात ‘घेऊन पोहणी करायची.
तान्ह्या पोळ्याला भल्या पहाटे उठून आमच्या लाकडी बैलांची डागडुजी आम्ही करून ठेवायचो. कारण सकाळी 10 वाजेपासूनच मारबती सुरू व्हायच्या. आई तहान लाडू, भूक लाडू डब्यात बांधून द्यायची. उड्या मारतच नेहरू चौकात जाऊन मोक्याची जागा पकडायची. बोंबा मारत इतवारीच्या मोहल्ल्यांमधून या मारबती मिरवतात. सोबत बडगेही असतात. “डेंग्युले घिऊन जाय गें मारबत….. बह्याडाले घेऊन जाय रे बडग्या…” रस्त्याच्या दुतर्फा तोबा गर्दी असते. या गर्दीत हरवून विस्फारलेल्या डोळ्यांनी मारबत पाहणं म्हणजे वैदर्भीय संस्कृतीचा भव्य-दिव्य सोहळा अनुभवणं असतं.
नागपूरची मारबत प्राचीन संस्कृतीचे प्रतीक आहेच. त्याचबरोबर आपल्या सामूहिक सुख-दुखा:चा ती एक आश्वस्त हूंकार आहे. जेव्हा तिची लेकरं ‘ईडा पिडा घेऊन जा गे मारबत’ अशी मनापासुन साद घालतात, तेव्हा इडा-पीडा पोटात घेऊन ती माउली धगधगत्या अग्नीला हसत हसत आलिंगन देते.
प्रविण बागडे
नागपूर
भ्रमणध्वनी : 9923620919
ई-मेल : pravinbagde@gmail.com