गुरूवारला उमेदवारांसाठी मेळावा
बुलढाणा (जिमाका) : राज्य मार्ग परिवहन महामंडळात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत कार्य प्रशिक्षण उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. उमेदवारांच्या निवडीसाठी गुरूवार, दि. २९ ऑगस्ट रोजी मेळावा घेण्यात येणार आहे. यात पात्र युवकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
यात लिपीक टंकलेखकाच्या १२ जागा भरण्यात येणार आहे. यासाठी पात्रता पदवीधर, टायपिंग इंग्रजी ४० शप्रमि, मराठी ३० शप्रमि, एमएससीआयटी असावी लागणार आहे. सहाय्यक १० जागांसाठी पात्रता आयटीआय मोटार मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, शीट मेटल वर्कर, वेल्डर, मेकॅनिकल रिपेअर ऍण्ड मेन्टेनन्स ऑफ हेवी व्हेईकल, तसेच शिपाई १ जागेसाठी पात्रता बारावी राहणार आहे. विजतंत्री १ पदासाठी पात्रता आयटीआय इलेक्ट्रीशियन ट्रेड असावी लागणार आहे. यासाठी वयोमर्यादा १८ ते ३५ वर्षे असावी लागणार आहे. कार्यप्रशिक्षणाचा कालावधी ६ महिने राहणार आहे.
सदर मेळावा विभाग नियंत्रक यांचे कार्यालय, रिलायन्स पेट्रोल पंपासमोर, मलकापूर रोड, बुलडाणा येथे सकाळी ११ वाजता घेण्यात येणार आहे. उमेदवारांना मेळाव्यास स्वखर्चाने उपस्थित राहावे लागणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवाराने त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. रिक्त पदासाठी ऑनलाईन नोंदणी करावी किंवा प्रत्यक्ष मेळाव्याच्या ठिकाण उपस्थित राहावे लागणार आहे त्याचप्रमाणे एम्प्लायमेंट कार्ड असणे आवश्यक आहे. यांत्रिक प्रवर्गातील उमेदवारांना दोन शिफ्टमध्ये कामगिरी करावी लागेल. उमेदवारांना दिलेल्या नेमणूकीच्या ठिकाणी कामगिरी करावी लागेल. उमेदवाराना किमान वेतन कायदा, राज्य कामगार विमा कायदा, कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा, कामगार नुकसान भरपाई कायदा व औद्योगिक विवाद कायदा लागू राहणार नाही. शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेले आणि करीत असलेले उमेदवार या योजनेस पात्र राहणार नाहीत. असे आवाहन राज्य परिवहनचे विभाग नियंत्रक यांनी कळविले आहे.