येत्या विधानसभेच्या निवडणुकीत सरकारला मोठी किंमत चुकवावी लागेल : राज्य अध्यक्ष कॉ.आनंदी अवघडे यांचा इशारा
बुलढाणा न्यूज : मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासना प्रमाणे 10 हजार रुपये मानधन वाढीचा शासन निर्णय सरकारने या अधिवेशनात काढून राज्यातील गटप्रवर्तकांची नाराजी दूर करावी, अन्यथा येणार्या विधानसभेच्या निवडणुकीत सरकारला त्याची फार मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा सीआयटीयु संलग्न आशा गटप्रवर्तक फेडरेशनच्या राज्य अध्यक्ष कॉम्रेड आनंदी अवघडे यांनी बुधवार, 26 जून रोजी बुलढाणा येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने जिजामाता महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित गटप्रवर्तकांच्या एल्गार मेळाव्याचे उद्घाटन करताना व्यक्त केले.
बुलढाणा जिल्हा सीटूचे जिल्हा अध्यक्ष कॉ. पंजाबराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याला फेडरेशनच्या राज्य महासचिव कॉम्रेड पुष्पा पाटील यांनी मार्गदर्शन करताना असे म्हटले की, लोकसभेची निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी गटप्रवर्तकांच्या मानधनात 10 हजार रुपयांची मासिक वाढ करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु प्रत्यक्षात शासकीय निर्णय काढताना फक्त 1 हजार रुपयाची मासिक वाढ केली. ही गटप्रवर्तकांची शुद्ध फसवणूक असून या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात घोषणा केल्याप्रमाणे 10 हजार रुपयाची गटप्रवर्तकांच्या मानधनात वाढ करावी. अन्यथा 2 जुलै रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर कृती समितीच्या नेतृत्वात राज्यभरातील गटप्रवर्तक प्रचंड मोर्चा काढणार आहेत.त्याच प्रमाणे संघटनेचे महत्व आणि पुढील आंदोलनाची दिशा याबाबत पुष्पा पाटील यांनी मार्गदर्शन केले. दि.2 जुलैच्या मुंबई मोर्चात बुलढाणा जिल्ह्यातील 100% गटप्रवर्तकांनी सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पंजाबराव गायकवाड यांनी उपस्थित गटप्रवर्तकांना केले.
यावेळी मंचकावर संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष रश्मी दुबे, राज्य कौन्सिल मेंबर जयश्री तायडे, अलका राजपूत यांच्यासह सपना जघेनिया, शालिनी डवले, लतिका गारमोडे, अन्नपूर्णा कुकडे, सारिका भास्कर, शशिकला कासदेकर इत्यादी सह मोठ्या संख्येने जिल्ह्यातील गटप्रवर्तक उपस्थित होत्या. या मेळाव्याचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक जयश्रीताई तायडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार अलका राजपूत यांनी मानले.