बुलढाण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी एस.रामामुर्ती यांनी केले होते दिपालीचे कन्यादान
बुलढाणा न्यूज : गत वर्षी 5 जुलै 2023 रोजी सहकार विद्या मंदिर, बुलडाणा या शाळेत शंकरबाबा पापळकर यांची मानस कन्या कु. दिपाली व आशिष जांगिड, बुलडाणा यांचा शुभविवाह बुलडाणा अर्बनचे सर्वेसर्वा श्री राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी व कोमलताई झंवर यांचे पुढाकाराने व तत्कालीन जिल्हाधिकारी श्री एस.रामामुर्ती यांच्या शुभहस्ते संपन्न झाला होता. या दांपत्यांला दि.27 मार्च 2024 रोजी कन्यारत्न प्राप्त झाले.
शंकरबाबा पापळकर यांनी मानसकन्या कु.दिपालीचा बालपणापासून सांभाळ केला, व मुलीचा विवाह चांगल्या घरात व्हावा यासाठी शंकरबाबा पापळकर यांनी हि जवाबदारी बुलडाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक यांचे वर सोपवली होती. भाईजी व शंकरबाबा यांनी मिळून होतकरू व सधन कुंटूबातील चिं आशीष जांगिड यांचेशी विवाह ठरविला होता. कु.दिपाली व चिं.आशीष हे दोघेही मूकबधीर असल्यामुळे त्या दोघांनी ही आनंदाने यास होकर दिला होता.
सदर बाब बुलडाण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्री एस रामामुर्ती यांना सांगितली असता, त्यांनी दिपालीचे कन्यादानाची जवाबदारी स्व:ताहा घेतली होती. व त्यानुसार हळदीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी यांचे निवासस्थानी पार पडला होता. व ईतर वैवाहिक कार्यक्रम व लग्न समारंभ सहकार विद्या मंदिर चे सांस्कृतिक भवन येथे पार पडला.
या विवाह समारंभास तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, अमरावतीचे सहाय्यक आयुक्त शामकांत म्हस्के यांची उपस्थिती होती. या दांपत्यांला नुकतेच कन्यारत्न प्राप्त झाले असुन दोन्ही परिवारातील सदस्य आनंदीत झाले आहेत, व या दोन्ही परिवारांनी तत्कालीन जिल्हाधिकारी एस रामामुर्ती, राधेश्याम चांडक, डॉक्टर सुकेश झंवर, सौ कोमलताई झंवर, तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी व ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष या वैवाहिक सोहळ्यास योगदान दिले त्यांचे आभार व्यक्त केले.