(उबाठा)शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन
बुलढाणा- आधीच हातचा गेलेला असताना रब्बी हंगामातील उत्पादनावर शेतकर्यांना मोठ्या आशा होत्या. मात्र सोमवारी, दि26 फेब्रुवारी रोजी झालेल्या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी अडचणीत आले. या नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण होऊन शेतकर्यांना थेट खात्यात आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात आज 27 फेब्रुवारी रोजी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. यावेळी चर्चाकरुन निवेदन सादर केले. यात नमूद आहे की, खरीप हंगामामध्ये दुष्काळ स्थितीचा सामना केलेल्या शेतकर्यांना रब्बी हंगामामध्ये मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने व गारपिटीने हिरावून घेतला आहे. बुलढाणा जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा पोहचत असताना रब्बी हंगामामध्ये बुलढाणा जिल्ह्यात सोमवार, दि. 26 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री झालेल्या अवकाळी पावसाने व गारपिटीने शेतकर्याच्या शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. हरभरा, गहू, कांदा, मका, फळबाग इत्यादी मालांचे नुकसान होऊन शेतकरी मेटाकुटीस आला आहे.
तरी या नुकसानीचा तात्काळ सर्व्हे करून शेतकर्यांना आर्थिक मदत देण्यात यावी. अन्यथा जिल्हा शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी महिला आघाडी जिल्हा संघटिका सौ.जिजाताई राठोड, विधानसभा संघटक अशोक इंगळे, तालुका प्रमुख लखन गाडेकर, किसान सेनेचे अशोक गव्हाणे, आशिष बाबा खरात, महीला आघाडीच्या दिपाली ताई वायचोल, वर्षाताई सोनोने, वैशाली कोलते, सुनिता जाधव, गणेश सोनुने, उप तालुका प्रमुख संजय गवळी, रमेश उबाळे, रामेश्वर बुधवत , किशोर सुरडकर, राहुल जाधव, दिनेश काळे, अनिल जाधव यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.