शाळेतील 400 विद्यार्थ्यांना शिबिराचा लाभ
बुलढाणा न्यूज
मोताळा : माझी शाळा, सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत आदर्श जिल्हा परिषद शाळा बोराखेडी येथे विद्यार्थ्यांसाठी मोफत लठ्ठपणा, मधुमेह व दातांच्या विविध आजारांबाबत शनिवार, दि.3 फेब्रुवारी रोजी मार्गदर्शन व दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर शिबिरामध्ये दंतशल्यविशेषज्ञ डॉ.आशिष खासबागे यांनी विद्यार्थ्यांच्या दातांची तपासणी करून दात व हिरड्यांच्या विकारांच्या पासून इतर विकार कसे बळावतात, याबाबत मार्गदर्शन केले. निरोगी राहण्याकरिता मौखिक आरोग्य जपणे आवश्यक असल्याचे महत्व पटवून देत गरजू विद्यार्थ्यांना पुढील उपचाराकरिता मार्गदर्शन केले. तसेच शाळेतील संपूर्ण विद्यार्थ्यांना टूथपेस्ट वाटप केले. या शिबिरामध्ये लठ्ठपणा व आहार तज्ञ डॉ. साधना भवटे यांनी संपूर्ण विद्यार्थ्यांना सकस आहार कसा घ्यावा, व्यायाम कसा करावा आणि आपले शरीर सुदृढ कसे ठेवावे, याबाबत माहिती दिली. लठ्ठपणा बाबत कोणकोणते दोष आहेत, त्या दोषांबद्दल माहिती दिली. लठ्ठपणा कसा कमी करता येईल, याबाबत सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी फास्ट फूड खाण्यापेक्षा भाजी पोळी व पालेभाज्या यांच्यावर जास्तीत जास्त जोर द्यावा, दुकानांमध्ये मिळणारे पॅकिंग पुड्यांमध्ये कुरकुरे वगैरे पदार्थ खाऊ नयेत, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
सदर शिबिराचा लाभ शाळेतील 400 विद्यार्थ्यांना झाला असून त्यासोबतच शाळेतील शिक्षकांना सुद्धा याबद्दल सखोल माहिती मिळाली. यावेळी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या आजाराबाबत आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांना सखोल मार्गदर्शन करून आरोग्य चांगले कसे ठेवता येईल, यासाठी उपस्थित डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. तसेच डॉ. खासबागे व डॉ. साधना भवटे हे कवी असून यांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व शारीरिक लठ्ठपणा बाबत विनोदी कविता सुद्धा सादर केल्यामुळे विद्यार्थ्यांनी कवितांचा आनंद लुटला. यावेळी मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांनी उपस्थित मान्यवरांचे शाल व पुष्प देऊन सन्मान करत आभार व्यक्त केले.