Online inauguration of 16 centers of Pramod Mahajan Rural Skill Development Centers in Buldhana district by Prime Minister Narendra Modi
बुलढाणा न्यूज – राज्यातील 511 ग्रामपंचायतींमध्ये प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांचे लोकार्पण गुरुवार, दि.19 ऑक्टोंबर रोजी ऑनलाईन पद्धतीव्दारे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सह्याद्री अतिथीगृह येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.
तसेच बुलडाणा तालुक्यातील सागवान केंद्र येथे आयोजित कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, बुलढाणाचे आमदार संजय गायकवाड, कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्र.व. खंडारे, तहसिलदार रुपेश खंडारे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमास नागरिक व युवकांचा मोठया संख्येने सहभाग लाभला होता.
ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार संधी व स्वावलंबी करण्यासाठी राज्य शासनाने प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र सुरु केले आहे. या केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण झाले. याप्रसंगी बुलढाणा जिल्ह्यातील 16 केंद्राचेही लोकार्पण नरेंद्र मोदी यांचे हस्ते करण्यात आले.
कौशल्य विकास प्रशिक्षण हा भारतातील युवकांच्या जीवनात नवी पहाट आणेल – पंतप्रधान नरेंद्र मोदीविकसित भारत घडवण्यात प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास प्रशिक्षणाची महत्वपूर्ण भूमिका राहील. त्या दृष्टीने महाराष्ट्राची प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांची योजना महत्वपूर्ण आहे, असे कौतुकोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. तर ही कौशल्य विकास केंद्र राज्यासाठी रोजगार मंदिरे ठरतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील 16 केंद्रांच्या ठिकाणी मान्यवर, नागरिक व युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने राज्यातील 350 तालुक्यांत स्थापन करण्यात आलेल्या 511 कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
बुलढाणा जिल्ह्यातील 13 तालुक्यातील प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र
यामध्ये बुलडाणा तालुक्यातील सागवान व सावळा, चिखली येथील अमडापूर , देऊळगाव राजा येथील देऊळगाव मही, जळगाव जामोद येथील आसलगाव, खामगांव येथील सटाळा बु. व घाटपुरी, लोणार येथील सुलतानपूर, मलकापूर येथील दाताळा, मेहकर येथील डोणगाव, मोताळा येथील धामणगाव बढे, नांदुरा येथील वडनेर भोलजी, संग्रामपूर येथील वरवट व सोनाळा, शेगाव येथील जलंब, सिंदखेड राजा येथील साखरखेर्डा या कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ करण्यात आला आहे. याचा फायदा युवक युवतींना घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.