जनता विद्यालय,पिंपळगाव सराईच्या विद्यार्थीनी कुस्तीपटू राज्यस्तरावर
पिंपळगाव सराई- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद बुलढाणा यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक – १६ सप्टेंबर २०२३ ला जिल्हा क्रीडा संकुल बुलढाणा येथे विभागीय शालेय कुस्तीच्या क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. यामध्ये जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव सराई येथील १९ वर्षाखालील वयोगटातील व ५९ किलोखालील वजनगटातील – कु. कांचन गजानन पवार व ६२ किलोखालील वजनगटातील – कु. पूनम सुखलाल इंगळे या २ खेळाडूंनी विभाग स्तरावर प्रथम क्रमांकाने विजय मिळविला असून त्यांची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.
कुस्तीमध्ये महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धा खेळणाऱ्या ह्या शाळेतील पहिल्याच खेळाडू आहेत. त्यामुळे त्यांचे सर्वच स्तरातून विशेष अभिनंदन होतं आहे. त्यांना क्रीडा शिक्षक बी.एन. आरसोडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
विजयी कुस्तीपटू खेळाडूंचे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे, सचिव प्रेमराज भाला सर्व संचालक मंडळ, प्राचार्य राजेंद्र जाधव, पर्यवेक्षक नंदलाल पाटील, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.